पुनश्च प्रजासत्ताक
लढने को तैय्यार हम
बाजी जीती अंग्रेजो से
छिनने को तैय्यार हम
लढने को तैय्यार हम
चाहे प्राण गए सरहद पर
चाए फंदा लगे गले पर
फिर ना मुकरेंगे हम
लढने को तैय्यार हम
आझादी का वास्ता लेकर
लढने को तैय्यार हम....
लढने को तैय्यार हम....
नखशिखांत स्वातंञ्याची ऊर्जा, रोमारोमांत प्रज्वलित करणारे हे बोल आहेत,आपल्या क्रांतिकारकांचे. हे बोल आहेत, १५०वर्षं ब्रिटिशांच्या साखळदंडात बंदिस्त राहूनही, स्वाभिमिनाच्या तलवारीने गोऱ्याचा थरकाप उडवणाऱ्या जहाल समाजसुधारकांचे! ब्रिटिशांनी १५० वर्षे भारताचं मीठ खाऊन, त्यांच्या इंग्रजी प्रांताला समृध्द केलं. माञ स्वतंत्र लोकशाही प्रजासत्ताक असणाऱ्या या देशाला, भारताचा क्रांतिकारी बाणा अंगीकारता आला नाही. अन् शेवटी घेतलीच त्यांनी माघार, कारण अंगलट आला होता त्यांना त्यांचाच अहंकार! हे सगळं घडलं फक्त भारताच्या क्रांतिकारी भुमिकेतून, त्यांच्यात आलेल्या स्वातंञ्याच्या आत्मभानातून! अन् खरंतर तो होता खरा लोकशाही प्रजासत्ताक भारत! ते होतं लोकांनी लोकांसाठी लोकांकरिता स्थापन केलेले राज्य! म्हणजेच लोकशाही!
आज २६ जानेवारी २०२४! आजपासून तब्बल ७४ वर्षांपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या संविधानाची अंमलबजावणी झाली होती. तो दिवस होता, दिनांक २६ जानेवारी १९५० चा! खऱ्या अर्थाने, भारताच्या प्रजासत्ताकावर यादिवशी शिक्कामोर्तब झाला. म्हणूनच हा दिवस आपण 'भारतीय प्रजासत्ताक दिन' म्हणून मोठ्या अभिमानाने साजरा करतो. तत्पूर्वी म्हणजेच १९४७ पूर्वी हा दिवस ‘स्वातंत्र्य दिन’ म्हणून साजरा होत होता. कारण २६ जानेवारीला १९३० म्हणजे जानेवारीच्या शेवटच्या रविवारी संपूर्ण भारतात पहिल्यांदाच तिरंगा फडकावला गेला आणि पुर्ण स्वातंञ्याचा संकल्प त्यावेळी घेण्यात आला होता. ही दिनांक कायमच भारतीय स्वातंञ्याच्या इतिहासात आठवणीत रहावी म्हणून या दिवसाचे औचित्य साधून संविधानाची अंमलबजावणी करण्यात आली होती. एवढा सगळा ७४ वर्षांचा ज्वलंत आणि कीर्तीवंत इतिहास घेऊन आज आपण प्रजासत्ताकाच्या पंचाहत्तरीच्या उंबरठ्यावर उभे आहोत.
याच पंचाहत्तरीच्या उंबरठ्यावरुन देशाकडे नजर टाकली, तर आपल्या सद्यस्थितीला भारत दोन भागात विभाजित झालेला दिसतो. हे दोन भाग अनेकार्थाने म्हणता येतात. सध्याच्या भारताची एकूण लोकसंख्या ही १४० कोटीपार आहे. या १४० कोटी जनमानसाचा देश एकीकडे विकासाच्या, तंञज्ञानाच्या, आधुनिकतेच्या, अगदी ऐशोआरामाच्या सीमारेषा गाठतो आहे. अन् याच नाण्याची दूसरी बाजू मरणासन्न गरिबीचं जीणं जगतांना दिसून येतेय. एकीकडे सरकारी क्षेञात कित्येक मंडळी रुजू होत आहे, तर दुसरीकडे एका वेळेच्या भाकरीसाठी सुशिक्षित बेरोजगार तरुण कामासाठी रस्ते तुडवत आहेत. मोठमोठ्या शहरांचे भाग प्रचंड पाण्याची नासडी करतांना दिसून येतात तर झोपडपट्टीवासीय, मध्यमवर्गीयांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागते आहे. ग्रामीण भागाची दयनीय स्थिती तर मग कुठल्या शब्दात मांडावी. सद्यस्थितीला सरकारी जागा देखील कंञाटीपद्धतीने भरल्या जात आहेत. एमपीएससी युपीएससी सारख्या परीक्षा तर होतात, पण निकाल लागायला मुद्दाम दिरंगाई केली जाते. का? तर कंञाटीपद्धतीने भरती केली गेली, तर संबंधित नोकरदाराला आधी पैसे भरावे लागतात. हे म्हणजे असंय, ‘आधी आम्हाला भत्ता द्या, मग नोकरी घ्या’. आताची परिस्थिती तर अशी आहे की, अगदी उच्चशिक्षित तरुणसुद्धा शिपाई पदासाठी अर्ज भरतात आणि फक्त सरकारी नोकरी हवी म्हणून लाखो रुपये भरतात. पण त्यांना हे ज्ञान नसतं की, याच पैशातून त्यांना मासिक प्राप्ती होते. यामुळे सध्याची शैक्षणिक स्थिती खूप अवघड होऊन बसली आहे. खरंतर व्यवसायात जे शिक्षण हवं, ते मुळात आताच्या शैक्षणिक अभ्यासक्रमातून मिळत नाही. त्यामुळे नोकरी शोधतांना तरुणांची हेळसांड होते. शिक्षित मुलांमध्येही कौशल्याचा अभाव असल्यामुळे कंपनी त्यांना नोकरीस ठेवण्याआधी १० वेळेस विचार करते. यामुळे कुठेतरी व्यावसायाधिष्टित शिक्षणप्रणाली असायला हवी. याव्यतिरिक्त अजून एक प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांना परत सरकार Retainer ship वर भरती करून घेतात. असे होत राहिले, तर मग नवीन तरुणांना कधी संधी मिळणार? नवीन नोकऱ्या कधी निर्माण होणार? म्हणूनच या संदर्भातही आपण लोकशाहीचा आधारस्तंभ म्हणून एकदा विचार करायला हवा. कारण हे सामान्यांचे, म्हणजे आपलेच प्रश्न आहेत. याला कारण कोण? व्यवस्था, जनता, सरकार की अन्य कोण? याला कारण आहे मानसिकता, या तिन्ही घटकांची मानसिकता. ज्यांनी ही लोकशाही व्यवस्था आखून दिली त्यांच्या विचारातला भारत नक्कीच हा नसावा.
लोकशाही, गणराज्य, धर्मनिरपेक्ष, प्रजासत्ताक राष्ट्र! अशी ही चतु: सुञी संकल्पना. माञ सद्यस्थितीला ना कुठली धर्मनिरपेक्षता देशात नांदतांना दिसते, ना कुठली लोकशाही! मुळात भारताच्या राजकारणाचा मुळ लोकशाही असणारा पाया आता जातीवादी लोकशाही हा झाला आहे. बघा लोकशाही अजूनही आहे! पण तिचे स्वरूप जातीवादी झालेय. एका कार्यक्रमात माझ्या एका सरांनी खुप सुंदर गोष्ट सांगितली, ती होती भाषेच्या बाबतीत. ते म्हणतात, कुठलीही भाषा ही कुठल्या जातीची, धर्माची, कुणा एकाच्या मालकीची नसते तर ती सर्वांची असते. भाषेतले जुने शब्द हरवणं म्हणजे भाषा मृत होत जाणं. अन् भाषा मृत होणं ही किती वाईट गोष्ट आहे, हे फक्त त्यालाच समजू शकतं, ज्याला भाषेची जाण असते. हे उदाहरण अगदी तंतोतंत इथे लागू होते. लोकशाही हे बीज ज्या क्रांतिकारकांनी अभिजात स्वातंञ्यासाठी पेरले, त्या क्रातिकारकांचं बीज आपण पार खोडून आपल्या मनमर्जीने कारभार चालवायला निघालोय. अन् असंच होत राहिलं तर एक दिवस लोकशाही सुद्धा आपल्याला मृतावस्थेत सापडेल आणि तो दिवस सगळ्यात वाईट दिवस असेल. भारताच्या प्रजासत्ताकाला घातक ठरणाऱ्या गोष्टी सध्या देशात घडतांना दिसून येत आहेत. लोकशाहीचा सर्वात मोठा पिंड म्हणजे या देशाची निवडणूक. येथून देशाच्या सगळ्या व्यवस्थेचं सूञ निश्चित होतं. अन् भारतात निवडणूका या लोकशाही पद्धतीने पार पडतात हे वेगळं सांगायची गरज नाही. परंतु हीच निवडणूक प्रक्रिया, या प्रक्रियेसाठी उभे असणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्यांपासून ते उमेदवारापर्यंत सगळ्या गोष्टी अगदी भेसळ झालेल्या आहेत. आताच्या प्रत्येक राजकीय व्यक्तींना सामाजिक भान नसून ते फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी निवडणूक लढवतात, राजकारण करतात. एक सामान्य कार्यकर्ता जेव्हा खुर्चीकडे जातो, तेव्हा त्याची कर्तव्य विसरून खुर्चीच्या मोहाच्या राजकारणातच तो आपली धन्यता मानतो. मात्र अजूनही सामान्य कार्यकर्ता माञ त्या नेत्यामागे घाम गाळत फिरत बसतो. अन् लोकशाहीचा आधारस्तंभ असणारी जनताच या नेत्यांकडून गुंडाळली जाते. मग या परिस्थितीला लोकशाही म्हणावं का? निवडुन येईपर्यंत जनतेला हात जोडणारे, नंतर जनतेला स्वत: चे पाय धूवायला लावण्यासही कमी करत नाही. ही आहे आजची सत्य परिस्थिती. मुद्दा काय तर जनतेतून मोठा झालेला नेता आता जनतेचाच राहिलेला नाही तर तो फक्त स्वत: चाच होऊन बसला आहे. याही परिस्थितीत काही नेटाने काम करणारे, समाजभान असणारे आहेत. पण त्यांचा आवाज जनतेला ऐकू जात नाही. कारण जनता फक्त भ्रष्टांचीच कात धरतांना दिसून येते.
२ महिन्यांच्या निवडणूक प्रचारात ५०० रुपयांची नोट घेऊन, ५ वर्षांची गुलामी आपण पत्करु शकतो; माञ ५ वर्षांचा आपल्या भवितव्याचा अभ्यास करुन निरपेक्ष पद्धतीने निवडणूक प्रक्रिया पार पाडणं, लोकशाहीयुक्त देशाच्या तत्त्वात बसत नाही. किती हा विरोधाभास! पण कटू असलं तरी हे वास्तव चिञ आहे. सध्याच्या भारताचं. जातीभेद, वर्णभेद, धर्मभेद, लिंगभेद, बेरोजगारी, दडपशाही या सगळ्या साखळदंडातून मुक्त झाली होती आपली भारतमाता; पण याच मुद्यांना घेऊन आज पुन्हा एकदा आपला देश संघर्ष करतो आहे. कारण याच मुद्यांना पाठीशी धरून आजरोजी मतदान होतांना दिसते. म्हणूनच आजचा हा प्रजासत्ताकाचा दिवस आणि त्याला लागून आलेली सुट्टी ही फक्त औपचारिकता म्हणून तिरंगा फडकावण्याची नाही, ५२ सेकंद सावधान मुद्रेत उभं राहून देशाचं राष्ट्रगीत नावाला म्हणण्यासाठी नाही, वा त्यानंतर भारतीय प्रजासत्ताक दिनाचा विजय असो! वंदे मातरम्! भारतमाता की जय! या घोषणा अगदी कंठ फाटे पर्यंत प्रसंगानुरूप देण्यासाठीही नाही तर तिरंगा, राष्ट्रगान, घोषणा, हे आपल्या स्वातंञ्याच्या लोकशाही चळवळीचे प्रतिकं आहेत. हा दिवस आपल्यातलं देशाप्रती, समाजाप्रती आत्मभान जागृत करण्यासाठी आहे. ही सुट्टी फिरण्यासाठी नाही तर लोकशाहीतल्या अधिकाराच्या जाणिवेसाठी आहे. अन् तिरंगा, राष्ट्रगान, घोषणा, पथसंचलन,ढोलवादन, बिटिंग द रिट्रिट सोहळा, लेझीम, चिञरथ,तो लाल किल्ला आपल्याला याच जाणिवांची आठवण करुन देत असतो.
म्हणूनच आपल्याला आजपासून विचार करण्याची गरज आहे. डोळसपणे लोकशाहीचा आधारस्तंभ म्हणून देशाच्या व्यवस्थेकडे बघणं गरजेचं आहे. वेळ कधीच जात नसते. आपल्यात बदलाच्या शक्यता निर्माण झाल्या की वेळ आपल्या पद्धतीने कार्य करायला लागते. म्हणूनच या प्रजासत्ताकदिनी मृतावस्थेच्या दिशेने मार्गस्थ होण्याआधी लोकशाहीला नवसंजीवनी देण्याच्या दृष्टीनं पाऊलं टाका. नक्की पुन्हा नवक्रांती होऊन आपली भारतभुमी प्रजासत्ताकाच्या प्रकाशात उजळून निघेल. देशात रामाराज्याचं निर्माण झालंय. आता फक्त भक्तीतून मनात राम येऊ द्या. मग बघा रामाच्या राज्यात कसे पुनश्च प्रजासत्ताक राष्ट्र प्रस्थापित होते....
अन् तो दिवस नक्कीच दूर नसेल
या आशेत......
भारतीय प्रजासत्ताक दिन चिरायू होवो!
🖋 प्राची नाईक उंडणगावकर🖋

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा